




दिनांक: २७ सप्टेंबर २०२५
डॉ. निलेश पुरकर यांच्या पुढाकाराने हृदयदिनानिमित्त आनंदोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी डॉ. पुरकर यांनी स्वतः शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना मनःपूर्वक आमंत्रित केले होते.
प्रारंभी डॉ. पल्लवी पुरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरती कपूर यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने कार्यक्रमाला रंगत आली. आहारतज्ज्ञ क्षितिजा गायकवाड यांनी हृदयविकाराच्या रुग्णांसाठी योग्य आहाराचे महत्त्व पटवून दिले व शंकांचे निरसन केले. योगगुरु संगू गुरूजींनी विनोदी व प्रभावी शैलीत योगाचे फायदे उलगडून सांगितले.
काही रुग्णांनी आपल्या मनोगतातून डॉ. निलेश पुरकर यांच्याविषयी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली आत्मीय साथ व काळजी कुटुंबातील सदस्याप्रमाणे असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. जे रुग्ण उपस्थित राहू शकले नाहीत त्यांची उणीव सर्वांना प्रकर्षाने जाणवली. पुढील कार्यक्रमात ते नक्की सहभागी होतील अशी आम्हा सर्वांची आशा आहे.
कारण शेवटी, या आनंदोत्सवाचा खरा हेतू म्हणजे – सर्वांनी मिळून नव्या उमेदीनं, नव्या उत्साहानं आणि निरोगी हृदयानं जीवन साजरं करणं!
