
दिनांक १३ जुलै २०२५ रोजी, दिल दोस्ती फाउंडेशनच्यावतीने “आजीच्या गोष्टी” या उपक्रमांतर्गत “कृष्णलीला” या विषयावर भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेत ७ ते १५ वयोगटातील मुलांनी उत्साहपूर्वक सहभाग घेतला. बालकृष्णाच्या बालपणावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. परीक्षा सकाळी १० वाजता सुरू झाली आणि सर्वच मुले खूप उत्साही आणि आनंदी होती. परीक्षेनंतर मुलांना खेळायला वेळ देण्यात आला ज्यामध्ये कबड्डी आणि इतर पारंपरिक खेळांचा आनंद मुलांनी मनमुराद घेतला.
सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. व सौ. गलगले यांचे डॉ. पल्लवी पुरकर यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन स्वागत केले. त्यानंतर मुलांच्या कथा सांगण्याच्या सत्राचे आयोजन करण्यात आले. काही मुलांनी कृष्णाच्या बाललीलांवरील कथा – पूतणावध, त्रिणावर्त, बकासुर वध, कंसवध, कालिया नाग आणि गोवर्धन पर्वत उचलणे या गोष्टी मोठ्या उत्साहात सांगितल्या. तसेच काही मुलांनी गणपती स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि विविध संlस्कृतिक श्लोकांचे पठणही केले.
यानंतर मुलांना खाऊ वाटण्यात आला व सर्वांनी स्नॅक्सचा आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या पुढील भागात “आजीच्या गोष्टी” या उपक्रमाच्या विशेष आजी – सौ. गलगले यांनी मुलांना संबोधित केले. त्यांनी मुलांच्या कथांना गुणही दिले. आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, कृष्णासारख खोडकर असायलाच हवे, पण त्याचबरोबर सत्याचा मार्ग अनुसरणे, मित्रमंडळींचे व कुटुंबाचे रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. मुलांनी दाखवलेले ज्ञान आणि संस्कृतीप्रतीचा ओढ पाहून त्या भारावून गेल्या.
कार्यक्रम चालू असताना सौ मंदाकिनी बागड, डॉ. वृषाली ठाकरे, पालकांपैकी श्री. कुलदीप शिरपूरकर आणि श्री. संदीप देशमुख यांनी मुलांचे पेपर्स तपासले. खेळांच्या वेळी श्री. नरेंद्र पवार, श्री.अतुल नेरकर, श्री.व सौ.देशमुख आणि सौ. येवले यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर प्रथम तीन विजेत्या मुलांची निवड करून श्री. व सौ. गलगले यांच्या हस्ते त्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. उर्वरित सर्व मुलांना विशेष डायरी गिफ्ट्स व कॅडबरी देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला. सर्वच मुलांनी हा कार्यक्रम खूपच एन्जॉय केला.
कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन डॉ. निलेश पुरकर आणि डॉ. पल्लवी पुरकर यांनी अतिशय सुयोग्य व सुंदर पद्धतीने पार पाडले.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पल्लवी पुरकर यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे, सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मन:पूर्वक आभार मानले. याच वेळी त्यांनी पुढील कार्यक्रमाची माहिती दिली की, ऑक्टोबर महिन्यात “छत्रपती शिवाजी महाराज” या विषयावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शेवटी सर्व मुलांनी एकत्र येऊन फोटो सेशन करून कार्यक्रमाची सुंदर सांगता झाली.



