आजीच्या गोष्टी – छत्रपती शिवाजी महाराज: द प्राइड ऑफ महाराष्ट्र

“संस्कार, इतिहास आणि प्रेरणेचा संगम – ‘आजीच्या गोष्टी: छत्रपती शिवाजी महाराज’

आपल्या पराक्रमी महाराजांचा इतिहास प्रत्येक मुलाला समजावा या उद्देशाने दिल दोस्ती फाउंडेशन मार्फत ‘आजीच्या गोष्टी – छत्रपती शिवाजी महाराज: – मराठी जनांचा अभिमान हा उपक्रम दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी अत्यंत उत्साहात पार पडला. दिल दोस्ती फाउंडेशन दर तीन महिन्यांनी ज्ञानवर्धक व संस्कारक्षम उपक्रम ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी आयोजित करतात.

या कार्यक्रमात मुलांनी उत्स्फूर्तपणे शिवकालीन पराक्रमाची झलक दाखवणाऱ्या वेशभूषेत हजेरी लावून संपूर्ण वातावरण शिवमय केले. कुणी छत्रपती शिवाजी महाराज, कुणी जिजामाता, तर कुणी शूर मावळे अशा रुपात मुलांनी सर्वांचे लक्ष वेधले.

“डॉ. पल्लवी पुरकर यांनी आपल्या स्वागतपर भाषणातून शिवबा आणि स्वराज्याची घडण मुलांना अगदी गोष्टीरूप, आकर्षक आणि सोप्या शैलीत समजावून सांगितली. त्यानंतर प्रश्नमंजुषेद्वारे मुलांमध्ये इतिहासाबद्दल जिज्ञासा व अभ्यासाची प्रेरणा निर्माण करण्यात आली.

लेखी परीक्षेनंतर मुलांनी पारंपरिक खेळ खेळले तसेच रंगमंचावर विविध नाटिका, गाणी आणि प्रसंगिक सादरीकरणे सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. राजेश कोठावदे व सौ. संध्या कोठावदे यांनी उपस्थित राहून मुलांच्या प्रस्तुतीचे परीक्षण केले.                                                                                                                                                            लहानगी स्पर्शिका मालपुरे हिने केलेल्या जोरदार शिवगर्जनेने सभागृह दुमदुमून गेले. तनिष्का लिटे हिने सादर केलेली ‘शिवा काशीद’ ची हृदयस्पर्शी गोष्ट अनेकांच्या डोळ्यात पाणी आणणारी ठरली. प्रणम्य पुरकर याने अफजलखान वधाचा दमदार पवाडा सादर करून सर्व प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणले. तर केवळ ७ वर्षांचा अर्जित कांबळे या चिमुकल्याने गायलेले गीत सर्व सभागृहाने दाद देत टाळ्यांच्या गजरात स्वीकारले.                                            परीक्षा मूल्यांकन कार्य श्री. व सौ. कोठावदे, डॉ. संदीप देशमुख, श्री. अतुल नेरकर, सौ. मंदाकिनी बागड आणि डॉ. दीपक पाटील यांनी पार पाडले. विजेत्या मुलांना ट्रॉफी व ‘शामची आई’ हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. ज्यांचे प्रस्तुतीकरण निवडले गेले त्यांना मेडल आणि पुस्तक देऊन गौरवण्यात आले. तसेच सहभाग घेतलेल्या सर्व मुलांना श्यामची आई हे पुस्तक रूपी पारितोषिक वितरण करण्यात  आले. या पुस्तकांचे प्रायोजकत्व डॉ. निलेश पुरकर यांचे मित्र श्री. नरेंद्र पवार यांनी केले. दिल दोस्ती फाउंडेशनमार्फत आजवर १२० लहान मुलांची हृदयशस्त्रक्रिया डॉ. निलेश पुरकर आणि डॉ.नितीन ठाकरे यांनी पूर्णपणे मोफत करून सामाजिक कार्याची एक अनोखी परंपरा जपली आहे.                                                                                                                                                                    तसेच दिल दोस्ती फाउंडेशन मार्फत “आजीचे लाडू” हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लहान मुलांना पौष्टिक आहार मिळावा या उद्दशाने राबविला जातो. समाजभिमुख दृष्टिकोन जपताना या उपक्रमांतर्गत वणी कसबे येथील वात्सल्यगृह अनाथाश्रमाच्या संचालिका सौ. कौशल्या पवार यांना आश्रमातील काही मुलांसह आमंत्रित केले होते. सौ. मंदाकिनी बगड यांनी स्वतः बनवलेले थंडीतील पौष्टिक सुक्या मेव्याचे लाडू डॉ. दीपक पाटील आणि डॉ. पल्लवी पाटील यांच्या हस्ते मुलांना देण्यात आले.                                                                                                                        कार्यक्रमानंतर मुलांनी स्वादिष्ट स्नॅक्सचा आस्वाद घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याची प्रेरणा आणि अभिमानाचा ठसा मनात घेऊन आनंदाने घरी परतले.

Scroll to Top